Schizophrenia Awareness Marathi…

२४ मे हा “जागतिक स्किझोफ्रेनिया दिन” म्हणून ठरवला आहे. फ्रान्स मधील फिलिपे पिनेल यांच्या स्मरणार्थ हा दिवस मानला जातो. त्यांनी स्किझोफ्रेनिया आजाराबद्दल समाजात असणारी चीड, या रुग्णांना दिली जाणारी हिन वागणूक याबद्दल क्रांती घडवून आणली म्हणून हा दिवस ठरवला आहे. या दिवसानिमित्त या आजाराबद्दल आधुनिक आणि शास्त्रीय माहिती जाणून घेऊया.

१. स्किझोफ्रेनिया म्हणजे नक्की काय?
स्किझोफ्रेनिया हा एक दीर्घकाळ चालणारा व तीव्र स्वरूपाचा आजार आहे. यामधे व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तुवणुकित परिणाम होतो. अश्या रुग्णांना काल्पनिक किंवा सत्य परिस्थिती मध्ये फरक करता येत नाही. इतर अजारांपेक्षा याचे प्रमाण जरी कमी असेल तरी त्रास मात्र भयंकर होतो. विचार प्रक्रिया बिघडते व आयुष्यातील ध्येय पासून व्यक्ती दुरावत जातो. अश्या रुग्णांना काल्पनिक आवाज ऐकू येणे, भास होणे, कोणीतरी आपल्याला कंट्रोल करते असा समज होणे, आपले विचार इतरांना समजतात असा संभ्रम होतो.
बऱ्याच रुग्णांना अशी लक्षणे सतत किंवा थोड्या थोड्या अंतराने जाणवतात. समाजात या आजाराचे जास्त ज्ञान नसल्यामुळे अश्या रुग्णांना सामाजिक बहिष्कारालाही तोंड द्यावे लागते. अश्या रुगांबाबत अनेक गैरसमज असून, सर्वात जास्त लोकांना असं वाटतं की हा आजार म्हणजे स्पिल्ट परसनालिटी म्हणजे द्वी किंवा अनेक व्यक्तिमत्व असणे. या आजाराच्या लक्षणामुळे व्यक्ती खूपच शांत, एकलकोंडा, किंवा रागीट बनू शकतो.
जरी हा दीर्घकालीन आजार असला तरी योग्य औषधोपचार, समुपदेशन, सामाजिक आधार याने इलाज होतो.

२. स्किझोफ्रेनिया कशामुळे होऊ शकतो? याची काय करणे आहेत?
यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात, परंतु एकच कारण याला देता येत नाही. आनुवंशिकता या आजारामध्ये दिसून येते. नातेवाईकांमध्ये याचे रुग्ण असेल तर इतरांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असते, पण शंभर टक्के होईलच असे नाही. सभोवतालचे वातावरण, आयुष्यातील मानसिक धक्के आणि घटनांचा यावर प्रभाव दिसून येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे मेंदूमधील रासायनिक बदल हे आहे. यातील अनेक रसायने शोधली आहेत व त्याच्या अनुषंगाने इलाज शोधण्याचे प्रयत्न केले आहेत.
यासोबतच मेंदूची जन्मतः संरचना पण या आजारास कारणीभूत ठरते. मेंदूमधील मज्जतातुंची ठेवण जर योग्य तऱ्हेने नसेल तरीही असा आजार होऊ शकतो. यामधे लहानपणी मेंदूची वाढ कशी होते, जन्मतः मेंदूला काही ईजा झाल्यास या आजाराची शक्यता बळावते. हे सर्व कारणे असूनही बऱ्याच रुग्णामध्ये काहीही कारण सापडत नाही.

३. स्किझोफ्रेनिया आजाराचे विविध प्रकार कोणते आहेत?
परानॉइड प्रकार – हा सर्वात जास्त प्रमाणात आधळून येणारा प्रकार आहे. यामधे तीव्र आणि विचित्र प्रकारचे भास आणि संशय निर्माण होतात. करणी केली, कोणी आपल्या वाईटावर आहे, कोणीतरी मुद्दाम त्रास देतो असे किंवा इतर विनाकारण भास निर्माण होतात.
डीसऑर्गनायझड प्रकार – यामध्ये प्रामुख्याने असंबंध बडबड आणि विचार, तसेच अनाकलनीय वर्तन दिसून येते. हा प्रकार साधारणपणे कमी वयात सुरू होतो.
कॅटाटोनिक प्रकार – सिनेमा मध्ये वेड्यावाकड्या स्थिती मध्ये उभे राहणारे रुग्ण या प्रकारात मोडतात. टोकाचे मौन, शारीरिक पोझिशन्स, तासनतास एकच स्थिती मध्ये उभे राहणे जे मानवी शक्यतेच्या बाहेर असते.
रेसिडूअल प्रकार – उपचार नंतर मुख्य लक्षणे जाऊन राहणारी वर्तने यामध्ये येतात. मनातून ओढ कमी होणे, काही काम किंवा कृती करण्याची सुरुवात करता न येणे, इतरांशी संवाद साधण्याचे जमत नाही.
स्किझोआफेक्टीव प्रकार – संशयी वागणे सोबत मनाचा मूड बिघडणे असे दोन्ही लक्षणे यात असतात.

४. स्किझोफ्रेनिया आजार कोणत्या वयात दिसून येतो?
हा आजार पुरुष व स्त्रिया दोन्हींमध्ये सारखाच प्रमणात सापडतो. जगाच्या पाठीवर सगळीकडे याचे प्रमाण जवळपास स्थिर आहे. ते लोकसंख्येच्या सरासरी एक टक्का इतकं आहे.
याची सुरुवात १५ ते २५ या वयोगातील मुलामध्ये होते. म्हणजे आपल्याकडे दहावी, बारावी ते पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत असते. यामुळेही बराच गोंधळ उडतो. पालकांना वाटते की अभ्यासाचं तणाव मुले अशी लक्षणे दिसत आहेत, परंतु हे खरं नाही. सुरुवातीला मित्रंपासून दूर राहणे, एकटे एकटे राहणे, झोप चक्र बिघडणे, मार्क कमी पडणे, चीड चीड होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात, जी या वयामधे कॉमन असतात. यामुळे याचे निदान होण्यास उशीर होतो.

५. स्किझोफ्रेनिया आजरचे निदान कसे करतात?
या आजाराची प्राथमिक लक्षणे माहिती करून घेतल्यास लवकर निदान करायला ८०% मदत होते. स्वतःला एकटे ठेवणे, विचित्र कल्पनांचे व संशयी विचार याचे प्रमाण वाढणे, इतरांपासून दूर होणे, नात्यामध्ये असा आजार असणे.
आजमितीला या आजाराचे निदान जागतिक आरोग्य संघटनेच्या, आजारांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण मध्ये दिलेल्या लक्षणांच्या वर्गवरीप्रमाने केले जाते. याचे निदान वैद्यकीय चाचण्यामार्फत करण्यासाठी संशोधन चालू आहे. कारण या आजराचा प्रत्येक फेरा मेंदूमध्ये नुकसान कारक ठरत असल्याचे ठाम पुरावे भेटले आहेत. म्हणून लवकर निदान व नियमित उपचार होणे गरजेचे ठरते.

६. स्किझोफ्रेनिया आजरावरती उपचार उपलब्ध आहेत का? ते कसे केले जातात?
हा आजाराचा रुग्ण उपचाराने खूप चांगला होऊ शकतो, पण यासाठी लवकर निदान व नियमित उपचार आवश्यक आहेत. अत्यंत तातडीच्या वेळी जेव्हा रुग्णांकडून स्वतःला किंवा इतरांना ईजा होण्याचा धोका असतो तेव्हा अंतररुग्न विभगात भरती करून उपचार केले जातात. प्रामुख्याने औषधे ही गोळ्या किंवा इंजेक्शन स्वरूपात असतात. यामुळे व्यक्तीचे भास तयार करणारी रसायने परत योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे लक्षणे कमी होऊन रुग्णाच्या विचार, भावना आणि वागणे यामधे चांगला बदल जाणवायला सुरुवात होते. ही औषधे मानसोपचार तज्ञ तुमची लक्षणे, वय, शारीरिक तपासणी आणि कामकाजाचे स्वरूप यावरून ठरवून देतात. यासोबत नियमित समुपदेशन, सामाजिक पुनर्वसन आणि आयुष्यातील महत्त्वाचे मार्गदर्शन केले जाते. याचा उपचार म्हणजे सांघिक कार्य आहे. मानसोपचातज्ज्ञ सोबत समुपदेशक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते, परिचर्या हे सर्वजण प्रयत्न करतात. अशी औषधे अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक आहेत.

७. स्किझोफ्रेनिया अजरावरती विद्युत उपचार पद्धती बद्दल काय सांगता येईल?
विद्युत उपचार म्हणजे रुग्णाला पूर्ण अल्पकाळ भुल देऊन अत्यंत कमी प्रमाणात विद्युत प्रवाह मेंदूमध्ये दिला जातो. यासाठी भूलतजज्ञ रुग्णाला शारीरिक ईजा होणार नाही याची काळजी घेतात. याचे दूरगामी दुष्परिणाम नगण्य आहेत. जागतिक स्तरावर या उपचार पद्धतीला सर्वात वरचा क्रमांक दिला गेला आहे.

८. आपल्या आप्तेष्टाना अशी लक्षणे दिसल्यास काय करावे?
यासाठी या आजाराबद्दल असणारे न्यूनगंड व गैरसमज दूर ठेवून आपल्या जवळच्या मानसोपचातज्ज्ञशी संपर्क साधावा. रुग्ण येण्यास तयार नसेल तर आपण जाऊन भेटावे व चर्चा करावी. आपणास नक्की मार्गदर्शन केले जाईल. निदान करून उपचार सुरू केल्यानंतर नियमित भेटी देत राहवे. रुग्ण औषधी घेतो की नाही यावर काटेकोरपणे लक्ष असू द्यावे. रुग्ण औषधी घेण्यास नकार देऊ लागला तर लगेच तुमच्या डॉक्टरांना भेटावे, काहीतरी मार्गदर्शन घ्यावे. परस्पर औषधे बंद करू नयेत. काही त्रास जाणवला तर त्वरित जवळच्या डॉक्टर ल भेटावे.

लक्षात ठेवा आपल्या आप्तेष्टांना असा आजार असल्यास आपल्या मदतीची आणि सहकार्याची गरज असते. अश्या वेळी मागे न सरकता, योग्य मार्गदर्शनाखाली उपचार केल्यास त्याचे जीवन आनंदी ठेवू.

डॉ नितीन भोगे
मानसोचार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या तज्ञ.
“मनोविश्व क्लिनिक”
943, सुधाकर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शर्मा स्वीट जवळ, सात रस्ता चौक, सोलापुर

कोरोना मृत्यू – वियोग आणि शोक

मृत्यू – वियोग आणि शोक

आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तरी जवळच्या व्यक्तीचा मृत्यूला तोंड द्यावे लागते. शोक म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प्रिय गोष्टीचा जाण्याने होणारे भावनिक, वैचारिक आणि वर्तणूक संबंधी बदल. वियोगाचे दुःख म्हणजे जवळच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर होणारा शोक.
वियोग आणि शोक यामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचे उदासी पासून ते उग्र स्वरूपाचा राग अशा कोणत्याही भावना येऊ शकतात. एखाद्या व्यक्ती कोणती प्रतिक्रिया देईल हे त्याच्या कौटुंबिक, सामाजिक, आणि शैक्षणिक पार्श्वभूमी, तसेच त्याची वैचारिक ठेवण, पूर्वीचे मत याबरोबरच गेलेल्या गोष्टीचा किंवा मृत व्यक्तीशी त्याचे संबंध यावर अवलंबून असते.

शोक म्हणजे फक्त खिन्नता नसून यामध्ये अपराधीपणा, जीवाची तळमळ, राग, आणि पश्चाताप यांचाही समावेश असतो. खूपदा भावनांचा आवेग किंवा कमतरता आपल्याला आश्चर्यचकित किंवा गोंधळून टाकू शकते. एखादा व्यक्ती वाईट संबंध असूनही दुःखी असेल. एकीकडे आपला आप्त कर्करोगाने गेला म्हणून वाईट पण वाटते तर मृत व्यक्तीला सुटका मिळाली म्हणून थोड बर पण वाटते.

वियोग असणारा व्यक्ती गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे निरनिराळे अर्थवाव काढून, एका विचारातून दुसऱ्या विचारात जात राहतो. जसे की, मृत व्यक्ती ने आयुष्य चांगले जगले म्हणून समाधान वाटेल, किंवा इतक्या लवकर जायला नको होते म्हणून त्रास होईल. लोक स्वतः वेगवेगळ्या गोष्टींना जबाबदार ठरवतात, उदा माझ्या हातात काही नव्हते पासून ते पूर्णपणे माझीच चूक होत पर्यंत.

वियोग मध्ये काहीजण आपल्या भावना इतरंजवळ व्यक्त करतात तर काहीजण एकटे राहतात व स्वतः ला व्यायाम किंवा लेखन अशा एकलकोंडया कामात गुंतवून घेतात.

मानसशास्त्रा प्रमाणे शोकाचे काही टप्पे असतात ते कुब्लर-रॉस यांनी शोधले आहेत.

 1. घडलेली घटना अमान्य असणे
 2. घडलेल्या घटनेबद्दल राग येणे
 3. जर तर विचारसरणी
 4. निराश वाटणे
 5. घडेलेले मान्य करणे
  कुब्लर-रॉस यांच्या मतानुसार प्रत्येकजण वरीलपैकी कमीतकमी दोन टप्पे तरी अनुभवतो. तर काही व्यक्ती वरील टप्पे आयुष्यात परत परत अनुभवतात.

शोक भावनेतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी करण्याची गरज असते.

 1. आप्तेष्ट मृत झाला हे मान्य करणे.
 2. वियोगचे दुःख सहन करणे.
 3. मृत व्यक्ती शिवाय आयुष्य सांभाळणं.
 4. आयुष्यात पुढे जात असताना मृत व्यक्तीच्या आठवणींशी जोडून राहणे.
 5. नवीन जबाबदाऱ्या सांभाळून घेणे.
 6. नवीन आयुष्याची सुरुवात करणे.

प्रत्येकाची शोक करण्याची जशी वेगळी वेगळी शैली असते ,तसेच त्यामधून बाहेर पडायला लागणारा वेळ पण वेगवेगळा असतो. बरेचजण सहाच महिन्यात बाहेर पडतील तर बाकी बरेच दिवस दुःखात राहतील. शोक जास्त दिवस राहिल्यास त्याचे दुष्परिणाम दिसतात यापैकी सर्वात जास्त आणि महत्वाचे म्हणजे नैराश्य.

शोक काळात भावना कठीण आणि गुंतागुंतीच्या असतात. परंतु यावेळी मौज, आनंद, विनोद, समाधान या भावना असूच नये असं काही नाही. स्वतःची काळजी, विरंगुळा, सामजिक आणि कौटुंबिक आधार यांचे फार महत्त्व आहे.

वियोग मृत्युमुळे असो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असो त्याचे दुःख सारखेच असते. यामध्ये अत्यंत कठीण गोष्ट म्हणजे नवीन परिस्थिती मध्ये स्थिर होणे, तेही आपल्या प्रियजनाचा अनुपस्थितीमध्ये. यासाठी आपणास नवीन दिनचर्या ठरवावी लागते तसेच भविष्याच्या दृष्टीने परत निर्णय बदलावे पण लागतात.

 • वियोगाच्या दुःखावर वेळ हे औषध आहे *असं म्हणतात कारण वेळ जाईल तसे याची तीव्रता कमी होत जाते. तरीही जवळपास १५% लोकांना याच्या दुष्परिणामा मधून जावे लागते.

यासाठी काही लक्षणे धोक्याची समजू शकतो ती खालीलप्रमाणे

 1. तीव्र उदासी आणि वेदनादायक भावना.
 2. एकटेपणाची किंवा निराशादायी विचार.
 3. मृत व्यक्तीला परत भेटण्याची इच्छा.
 4. सतत मृत व्यक्तीचं किंवा मृत्युसमयी चा विचार करणे.
 5. मृत व्यक्तीच्या सोबत असणाऱ्या आनंदी क्षणाच्या आठवणी सांगणे अवघड वाटणे.
 6. मृत व्यक्तीच्या वस्तू किंवा ठिकाणी जाणे टाळणे.
 7. सर्वांपासून स्वतःला दूर करणे आणि एकटे एकटे राहणे,
 8. आपल्या आयुष्यात पुढे काही करण्याची इच्छा नसणे.

अश्या प्रकारच्या परिस्थिती मध्ये तनावामधून शरीरात विविध प्रकारचे रासायनिक बदल होऊन त्याचा शारीरिक प्रक्रिया वरती पण परिणाम दिसायला सुरू होतो.

कोरोना आणि शोक

इतर वेळी उपलब्ध असणाऱ्या रुढी परंपरा आणि विधी यामुळे व्यक्तीला शोक मधून बाहेर येण्यास मदत होत होती. परंतु कोरोणा मूळे आपणास अशा वेळी आपले आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासोबत आपल्या भावना व दुःख व्यक्त करता येत नाही. त्यामुळे अश्या भावना एकट्याने सामोरे जाताना अत्यंतिक त्रास जाणवू शकतो. म्हणून आपण याची माहिती घेणे गरजेचे आहे. आजच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडिया मूळे काही प्रमाणात त्याची भरपाई होऊ शकते.

नेहमीची काळजी घेत असताना आपणास अजूनही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोरोना हे संकट मोठे आहे. हे आपण मान्य केले पाहिजे. त्यासाठी हारकिरी न करता सावधानता बाळगली पाहिजे. भावनिक समतोल राखता आला पाहिजे. आपल्या आप्तेष्ट व्यक्ती ची काळजी घेताना स्वतःला पण सुरक्षित ठेवले पाहिजे.

यावेळी इतर नातेवाईक भेटू शकत नाहीत हे आपण स्वतःला समजावले पाहिजे. ते यात नाहीत म्हणजे आपण अजून एकटे पडलो असं गैरसमज करून घेऊ नये. होईल तेवढे कुटुंबासोबत राहवे. घरातील लहान मुले यांच्या भावनेचा विचार जरूर करावा. ते लहान आहेत त्यांना कमी त्रास होतो असा विचार करू नये. त्यांना समजेल अशा प्रकारे सर्व गोष्टी खर खर सांगाव्या. त्यांचे दैनंदिन दिनक्रम बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आपणही आपले दिनक्रम सुरू ठेवावा.

जे तुमचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्या नियमित संपर्कात राहावे. वडिधाऱ्या मंडळी सोबत बोलत राहवे. त्यांची भीती कमी करावी. त्यांना आधार द्यावा.

यातूनही काही जास्त मानसिक त्रास जाणवत असेल या वियोगतून बाहेर पडणे कठीण जात असेल तर समुपदेशक किंवा मानसोपचरतज्ज्ञ ची भेट घ्यावी.

व्यक्ती लहान होता की मोठा होता, जवळचा होता की लांबचा होता यावर तुमचा त्रास ठरत नाही. मदत घेतल्याने नक्कीच त्रास कमी होईल. आपल्या भावनांचा समतोल राखणे आणि इतर दुष्परिणाम होऊ न देणे महत्वाचे आहे.

शेवटी काय वेळ हेच औषध आहे शोक वर ही आणि कोरोना वर ही.

ही वेळ निघून जाईल तो पर्यंत आपण सावध राहूया.

डॉ नितीन भोगे
एम .बी.बी.एस. एम. डी.
मानसोचार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या तज्ञ.
9923964567

“मनोविश्व क्लिनिक”
943, सुधाकर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शर्मा स्वीट जवळ, सात रस्ता चौक, सोलापूर.
9130621531

Covid 19 and world mental health day…

कोरोना आणि जागतिक मानसिक स्वास्थ दिवस…

दरवर्षी 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “मानसिक आरोग्य सर्वांसाठी…अधिक गुंतवणूक ,अधिक उपलब्धता!” असे घोषवाक्य ठेवले आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहेत. मानसिक स्वास्थ्य साठी इतका भयानक प्रसंग यापूर्वी कधी आला नाही. म्हणूनच जागतिक पातळीवर यादृष्टीने दूरदर्शी पाऊले उचलण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या साथी मध्ये आपल्या लक्ष्यात आले आहे की, काही संकटे मानवी क्षमतेच्या बाहेरील असतात. अश्या वेळी धीोदात्तपणे सामोरे जाणे, मनस्थिती स्थिर ठेवणे अत्यंत गरजेचे ठरते.
कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून एक चांगले उदाहरण तयार केले. यामध्ये आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागलो. सरकारची नियम व अटी आनंदाने स्वीकारत होतो. एकदम कडकडून लॉकडाऊन चे पालन केले. नवीन छंद जोपासले, घरच्यांसोबत वेळ घालवला. एकंदरीत पणे हा वेळ समाजाच्या मानसिक स्वास्थ्य साठी फायद्याचा ठरला.

सुरुवातीच्या काळात ज्यांनी या साथीची तीव्रता समजून घेऊन पुढील येणाऱ्या अनिश्चितेच्या काळची तयारी केली त्यांना मानसिक स्थिरता टिकून राहिली.
पण ज्यांनी साथीला शुल्लक समजून सर्व शिल्लक साठा संपवला त्यांना पुढील लॉकडाउन काळात अडचणी येऊ लागल्या.

जसे जसे लॉकडोऊन चा कालावधी वाढत गेला तसे तसे लोकांची मनस्थिती बिघडत जाऊ लागली.
यामध्ये सुरुवातीला बेचैनी, भीती, निद्रानाश, एकटेपणा, अश्या तक्रारीं जाणवू लागल्या.
सारखं आपल्याला कोरोणा झाला असेल का किंवा होईल का अश्या शंका येऊ लागल्या. यामध्ये मानसिक आधार नसलेल्या लोकांचा जास्त सामावेश होता.

यावरून लक्षात येते की आपली मानसिक स्वास्थ्यासाठी पहिली गुंतवणूक ही अडचणीच्या वेळी मानसिक आधार देणारी ठिकाणे, व्यक्ती किंवा वस्तू तयार ठेवणे. प्रत्येकाने अश्या व्यक्ती आपल्या नातेवाईक, मित्र किंवा हितचंतक यामध्ये शोधून घ्याव्या. यांच्या नियमित संपर्कात राहावे. जेणेकरून पुढील धोके टाळू शकू. अश्या गोष्टींना आपण आपला संकटमोचक किंवा मानसिक आधार देणारी पेढी असं म्हणू शकतो.यासोबतच आपल्याला मानसिक समाधान मिळणाऱ्या गोष्टींची ओळख करून घ्यावी. त्यांची जोपासना करावी. यामध्ये विविध छंद, खेळ, आवडी निवडी, संगीत, वाचन, पर्यटन, लेखन वगैरे ची समवेश होतो.

यानंतर ज्यांच्या घरात कारोना चा संसर्ग झाला किंवा ज्यांना विलागिकरणात राहवे लागले. त्यांना तो काळ खूप मानसिक खाच्चीकरणा च वाटला. यामध्ये आपल्या आप्तेष्टांच्या आरोग्याची चिंता, स्वतःच्या आरोग्याची चिंता, घराच्या सुरक्षेची चिंता, आर्थिक नियोजन बिघडण्याची चिंता इत्यादी प्रकारच्या तणावामुळे अनेकांना तीव्र स्वरूपाचा स्वभाव बदल जाणवला. अनेकांना सर्व समाज आणि शासन व्यवस्था यांच्या बद्दल राग वाटू लागला. त्यामध्ये डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर पण राग व्यक्त केला जाऊ लागला. अश्या कितेक लोकांना अफवांवर विश्वास बसू लागला. त्यातून अजूनच मनस्थिती बिघडत गेली. अशी व्यक्ती समाजापासून दूर जाऊ लागली.

यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की मानसिक स्वास्थ्य साठी पुढची गुंतवणूक म्हणजे, अश्या संकटांचा अभ्यास करणे, तर्कसंगत आणि विवेकपूर्ण विचापद्धतीची सवय लावणे, सकारात्मक विचारांचा पाया भक्कम ठेवणे.
अश्या वेळी ज्या व्यक्ती विवेकपूर्ण आणि स्थिर चित्ताने सामोरे गेल्या त्या मानसिक दृष्ट्या अजून सक्षम बनून बाहेर पडल्या. यासाठी नियमित पने स्वतःच्या विचार पद्धतीची पाहणी करणे, आत्मचिंतन करणे, इतरांच्या आपल्याविषयी मत जाणून घेणे व योग्य ते बदल करत जाणे गरजेचे आहे. यासाठी स्वतःला नियमित दररोज वेळ काढून ठेवणे, दैनंदिनी लिहिणे, दिवसभरातील घटनाचा झोपण्यापूर्वी सखोल विचार करणे. मनातील वाईट भाव ओळखणे व दूर करणे अश्या सवयी ठेवल्या पाहिजेत.

पुढची गोष्ट आहे ती या साथीच्या काळात ज्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अश्या लोकांना नैराश्य ची लक्षणे दिसू लागली. जसे कशातच मन न लागणे, सारखं उदास वाटणे, थोड्या कामाने पण थकवा जाणवणे, भूक आणि झोपेच्या समस्या निर्माण होणे इत्यादी. यातून वेळीच उपाय योजना न केल्यास किंवा उपचार न घेतल्याने स्वतःवरच ताबा सुटणे, आत्महत्येचे विचार येणे आणि त्यावर कृती करणे या प्रकारच्या मानसिक आजारपणात वाढ झालेली दिसून येते.

या व्यक्तींना तातडीची मानसिक उपचाराची गरज असते. त्यासाठी समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे.
हे उपचार ही पण एकप्रकारची गुंतवणूक आहे. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊन इतर हानी टळली जाते.

सर्वात जास्त मानसिक तणावाला सामोरे जावे लागले ते म्हणजे ज्यांच्या घरात कोरोना मुळे अकाली मृत्यु झाले. यामध्ये अचानक होणारे मृत्यू मानसिक दृष्ट्या व्यक्तीला दुभंगून टाकतात. या साथीमुळे अश्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करणे जमत नाही. आपल्यामुळे त्यांना लागण झाली का? अशी खंत आयुष्भर सतावत राहते. मनाला खाते. तो व्यक्ती घरचा प्रमुख आणि कमवता असेल तर अजूनच अस्मानी संकट वाटते. अश्या वेळी आपण घरी किंवा स्वतः देखील आजारी असलो आणि दवखण्यात भरती असेल तर जास्त प्रमाणात तणाव येतो.
नियमित रुढी परंपरा आपणास या संकटातून बाहेर निघण्याचा अवधी देतात, इतर आप्तस्वकीय आपल्या आधाराला येती. कोरोना साठीमध्ये तो आधार पण मिळू शकला नाही. अश्या व्यक्ती पूर्णपणे खचून जाऊ शकतात.
त्यांना आपण मानसिक आधार स्वतः हून द्यावा लागतो. यासाठी आपण स्वतः मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणे महत्त्वाचे आहे.

यामध्ये गुंतवणूक म्हणजे भविष्याचे प्लॅनिंग व्यवस्थित करणे. संकट कधीही येऊ शकते अशी तयारी ठेवणे. अश्या वेळी हक्काने मदत मागू शकतो असे मित्र किंवा नाते तयार करणे. जे निस्वार्थ पने आपल्या कुटुंबच रक्षण करतील. त्यांना परत उभे राहण्यास आधार देतील. पण असे नाते अपोपाप तयार होत नाही. त्यासाठी आयुष्भर गुंतवणूक करावी लागेल. जी भावनिक पातळीवर खोलवर रुजत जाईल व वर्षानुवर्ष टिकेल. त्यासाठी आपणही इतरांना निस्वार्थ भावाने मदत करत राहिले पाहिजे.

वरील लेखात आपण पाहिले की तहान लागल्यावर विहीर खणणे जमत नाही, त्यासाठी नियोजन करावे लागते.

मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करावी लागते. त्यापैकी खालील उदाहरणे आपण पाहिली.

१. अडचणीच्या किंवा मानसिक अस्थिर ते च्य वेळी अधिकार वणीने योग्य सल्ला देणारे व्यक्तींना नियमित संपर्क ठेवणे

२. मानसिक समाधान मिळणाऱ्या गोष्टींसाठी वेळ व पैसा खर्च करणे

३. स्वतः चे विचार विवेकपूर्ण, तर्कसंगत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी योग्य त्या सवयी लावणे

४. योग्य वेळी कसलाही संकोच न बाळगता मानसोपचार तज्ज्ञांची मदत आणि उपचार घेणे

५. निस्वार्थ भावनेने काही नाती आणि मित्र जवळ करणे


अश्याच प्रकारची पंचसूत्री आपले मार्गदर्शक आपल्याला नियमित सांगत असतात. पण आता याकडे दुर्लक्ष न करता यावर अमलबजाणीसाठी सुरुवात करुया. एकमेकांना सोबत घेऊन सर्व समाज्याच्या मानसिक स्वाठ्याची चळवळ उभी करुया. आणि या कोरोनाच्या संकटातून तावून सुलाखून बाहेर निघण्याचा प्रयत्न करुया.

डॉ नितीन भोगे
मानसोचार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या तज्ञ.
“मनोविश्व क्लिनिक”
943, सुधाकर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शर्मा स्वीट जवळ, सात रस्ता चौक, सोलापूर
9130621531

Awareness about Dementia and Alzheimer’s in marathi…

जागतिक स्मृतीभ्रंश दिन २१ सप्टेंबर निमित्त

http://www.manovishwaclinic.com

स्मृतीभ्रंश आणि नोंदवही

डॉ नितीन भोगे, सोलापूर

वय वाढेल तसे आपल्या स्मृती, विचार आणि वागण्यामध्ये बदल होणे साहजिक आहे. परंतु कधी कधी या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण करू लागतात. तेंव्हा मात्र आपण याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण ही एका गंभीर आजाराची म्हणजे स्मृतीभ्रंश ची लक्षणे असू शकतात.
स्मृतीभ्रंश म्हणजे व्यक्तीच्या स्मृती आणि वैचारिक क्षमता मध्ये कमकुवतपणा येतो. अश्या अडचणी आपल्या दैनंदिन जीवनातील कार्ये करताना अडथळा निर्माण करतात. हा वयोमानाप्रमाणे होणारा बदल नक्कीच नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे अल्झायमर नावाचा आजार आहे. यामध्ये व्यक्तीच्या मेंदूतील पेशींची प्रमाणापेक्षा जास्त झीज होते, त्यांचे काम पण कमी होते.

अल्झायमर आजाराची १० प्रमुख लक्षणे
१. दैनंदिन जीवन जगताना त्रास देणारा विसराळूपणा
हे सर्वात जास्त दिसून येणारे तसेच सर्वात अगोदर दिसून येणारे लक्षण आहे. यामध्ये प्रथम अलीकडील काळात घडलेल्या घटना व मिळालेली माहिती विसरायला चालू होते. हळूहळू महत्वाच्या तारखा, अपॉइंटमेंट विसरू लागते, सारखं सारखं घरच्या किंवा इतर व्यक्तींना एकच गोष्ट विचारणे, गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मदत लागणे, वस्तू विसरणे इत्यादी.
वयोमानाप्राणे येणाऱ्या विसराळू पणा मध्ये मात्र इतका त्रास होत नाही व अश्या गोष्टी नंतर आठवतात.

२. कामाचे व इतर नियोजन करणे, समस्या सोडवणे जमत नाही
स्मृतीभ्रंश झालेल्या व्यक्तींना नियोजनपूर्वक काम करणे, त्याप्रमाणे टप्याटप्याने प्रगती करणे, समस्या उभ्या राहिल्या तर ऐनवेळी उपाय न समजणे अश्या अडचणी येतात. अश्या कामवर लक्ष केंद्रित करणं जमत नाही, तसेच पहिल्यापेक्षा जास्त वेळ लागणे, चुका वाढणे असे होते.

३. सवयीची कामे करतानाही अवघड जाणे
नेहमी केली जाणारी कामेही करणे अवघड होते. एखाद्या ठिकाणी जाऊन परत येणे जमत नाही. दुकानातून सामान आणताना चुका होतात. नियम लक्षात ठेवणे जमत नाही.

४. वेळ व जागा याबद्दल संभ्रम निर्माण होणे
तारीख, वार, ऋतु, महिना, वर्ष इत्यादी लक्षात न राहणे, कधी कधी दिवसातील वेळ पण न समजणे यामुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. त्यांना स्वतःला आपण कुठे आहोत किंवा कुठे जायचे समजत नाही. रस्ता चुकणे, पत्ता विसरणे अश्या दुर्घटना घडायला सुरुवात होते.

५. नजरचुका वाढणे, रंग किंवा अंतर यांचा अंदाज न येणे
काही रुग्णांमध्ये वाचताना चुका होतात, त्यांना अंतर, रंग, रंगछटा यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता वाढते.

६. संवादकौशल्य कमी होणे
वस्तूंचे नावे न आठवणे, ऐन वेळी शब्द न सुचणे, इतरांशी बोलताना पुढे काय बोलायचे किंवा समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे न कळल्यामुळे तान येतो.

७. वस्तू ठेवून विसरून जाणे, हरवून येणे, आणि परत त्या शोधणे अश्यक्य होणे
असे रुग्ण वस्तू नेहमीच्या ठिकाणी ऐवजी अनिश्चित ठिकाणी ठेवतात त्यामुळे अश्या वस्तू हरवतात. त्यांना परत सर्व हालचाली आठवून ती वस्तू शोधणे जमत नाही. आजाराच्या पुढच्या टप्प्यात असे रुग्ण वस्तू हरवण्यासाठी इतरांवर संशय घेऊ लागतात.

८. निर्णयक्षमता कमी होणे, किंवा पूर्णपणे बिघडणे
अश्या रुग्णांना निर्णय घेण्यात अनेक अडचणी जाणवतात. स्वतःचे आर्थिक किंवा इतर वैयक्तिक व्यवहार करताना अनेक चुका होतात. यातून कायदेशीर पेचप्रसंग उभे राहतात. स्वतःचे राहणीमान पण व्यवस्थित ठवणे अवघड जाते.

९. सामजिक आयुष्यातून व जबाबदाऱ्या मधून स्वतःला वेगळं करणे
संवाद साधण्यात येणाऱ्या अडचणीमुळे असे रुग्ण आपल्या आवडीनिवडी, छंद, सामाजिक कार्य इत्यादी ठिकाणी जाणे टाळायला चालू करतात. स्वतःची आवडती टीम किंवा खेळ लक्षात राहत नाही.

१०. स्वभाव गुण आणि मानसिक स्थिती बिघडत जाणे
आजराच्या पुढच्या टप्प्यात असे रुग्ण संभ्रमाव्थेतून जातात, ते संशयी, उदास, भयभीत आणि बेचैन असतात. ते इतरांवर लगेच चिडतात, नवीन ठिकाणी बेचैन होतात.

मित्रानो यातून आपण लक्षात घेतले पाहिजे की, वयस्कर व्यक्ती स्मृतीभ्रंश आजाराची वरील लक्षणे दिसत असतील तर आपण त्यांना समजून घेऊया. त्यांना आधार देऊया. त्यांची काळजी घेण्यासाठी पुढे येऊया.

या आजराची सोप्या भाषेत ओळख करून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपण जन्माला आलो त्या वेळी, आपणास एक नोंदवही भेटली. जी पूर्ण कोरी आहे. त्यामध्ये आपण जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षण नोंद करत जातोय. या सर्व नोंदी वेळेच्या क्रमाने होत आहेत. आयुष्य जसे पुढे जाईल तसे त्या नोंद वाहितील पाने पण संपत जातील. एक दिवस असा येईल की नोंदवही संपून जाईल. पुढच्या नोंदी करण्यासाठी जागा नसल्यामुळे त्या आठवणी आठवून ठेवता येणार नाहीत. ही या आजाराची सुरुवात होय. म्हणून यामध्ये अलीकडील माहिती व गोष्टी विसरतात. जुने सगळे लक्षात राहते.
आता आपण थोडा पुढे विचार करू. जसा जसा आजार वाढेल तसे तसे या नोंदवहीत असणारी शेवटची पाने नष्ट होत जातात. म्हणजे आठवणी वयाच्या उलट्या क्रमाने नष्ट होतात. एक प्रकारे असा रुग्ण वरचेवर वयाने लहान लहान होत जातो.
हे उदाहरण लक्षात ठेवले तर अश्या रुग्णांना समजून घेण्यासाठी व यांची काळजी घेताना मदत होते. काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी स्वताच्या मानसिक आरोग्याची नियमित काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.
चला तर या वर्षीच्या जागतिक स्मृतीभ्रंश दिन २१ सप्टेबर निमित्त निर्धार करून अश्या रुग्णांना न झिडकरता आधार देऊ.

डॉ नितीन भोगे
मानसोपचर, व्यसमुक्ती व लैंगिक समस्या तज्ञ
“मनोविश्र्व क्लिनिक”
सुधाकर कॉम्प्लेक्स
पहिला मजला
शर्मा स्वीट जवळ
सात रस्ता, सोलापूर
९१३०६२१५३१

“लॉकडाउन आणि मुलांचे मानसिक स्वास्थ्य”

“लॉकडाऊन आणि मुलांचे मानसिक स्वास्थ्य”

गेल्या आठवड्यात एक सातवी चा मुलाला घेऊन त्याचे वडील ओपीडी मध्ये आले.
“मुलगा अचानक वेगळाच वागत आहे. सारखं हे दुखत ते दुखत असा म्हणत आहे. लहान मुलांच्या डॉक्टर ला पण दाखवले. सर्व तपासण्या करून घेतल्या आणि त्या नॉर्मल आहेत. त्यामुळं तुम्हाला दाखवायला सांगितले आहे.”
मी सर्व माहिती घेतली. त्याप्रमाणे मुलगा थोडा हट्टी होता परंतु समजूतदार पण होता. लक्षणे सुरू होण्यापूर्वी एक आठवड्यामध्ये समोरच्या अपार्टमेंट मध्ये कोरोना मुळे दोन मृत्यू झाले होते. तसेच एक जवळचे नातेवाईक ही कोरोना मुळे आजारी पडले होते. या सर्व गोष्टींची चर्चा घरात होतच असते.
त्याच्या शी बोलल्या नंतर लक्षात आले की त्याला विश्वासात घेऊन ही सगळी चर्चा करण्यात आली नाही. अचानक त्याच्या वेळापत्रक बदल घडत गेले. याच्याशी त्याला जुळवून घेता आले नाही. ज्याचा त्याच्या मनावर तान आला. कसे वागावे हे न समज्यामुळे घाबरून गेला व वागण्यात विचित्र बदल होत गेले.
त्याच्याशी संवाद साधून त्याला नियमित वेळापत्रक ठेवून काही छंद जोपासण्यासाठी सांगितले. तात्पुरती औषध देऊन वडिलांना धीर दिला व त्याच्याशी वागण्यासाठी समुपदेशन केले.

या उदाहरणांसह आपल्या लक्षात येईल की कमी अधिक प्रमाणात लहान मुलांमध्ये अश्या समस्या पहायला मिळू शकतात.

या समस्या टाळायच्या असतील तर आपण काही काळजी घेतली पाहिजे.

१. वेळेचे नियोजन – बहुतांशी मुलांचा दिनक्रम बिघडलेला आहे. त्यामध्ये नियमितता असायला हवी. मुलांना नवीन वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे वागायला सांगणे. सकाळी उठणे, खेळणे अभ्यास इत्यादी गोष्टींचा वेळ ठरवून देणे. आता काही ठिकाणी शाळेचा अभ्यासक्रम चालू झालेला आहे. त्याप्रमाणे तो करून घेणे गरजेचे आहे.

२. शिक्षण – आता मुले घरीच असल्यामुळे पालक हेच त्यांचे शिक्षक असणार आहेत. शालेय अभ्यासक्रम सोबतच मूल्य शिक्षण ही तितकेच महत्त्वाचे आहे. इतर पुस्तके वाचायला देणे त्यावर चर्चा करणे अश्या गोष्टीचा सहभाग हवा. शाळेच्या अभ्यासात काही अडचण येत असल्यास त्याबाबत योग्य मार्गदर्शन शाळेतून भेटत असेल तर घ्यावे.

३. सुसंवाद – घरामध्ये सर्व नातेवाईक व मुले यांचा संवाद होण्यासाठी आता पोषक वेळ आहे. कोरोना संबंधी काही चर्चा असल्यास ती मुलांपासून लपवू नये. त्यांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. तसेच पुढील भविष्यकाळात येणाऱ्या कष्टांची कल्पना द्यावी.

४. मानसिक आरोग्य – या वेळात मुलांना एकटा बसून विचार करू द्यावा. त्यांना योगा, मेडिटेशन इत्यादी गोष्टींची ओळख करून द्यावी. मनातल्या गोष्टी इतरांशी बोलून दाखवण्यास प्रोत्साहन द्यावे. इतरांना धन्यवाद देणे, चांगले म्हणणे अश्या सकारात्मक सवयी लागल्यामुळे सकारात्मक विचार वाढण्यास मदत होईल.

५. शारीरिक व्यायाम – मिळालेल्या संधीचा उपयोग करून घरातल्या घरात करता येतील असे व्यायाम प्रकार मुलांना शिकवावे. त्यांच्यासोबत आपण पण करावे. सूर्यनमस्कार, योगा, दोरीवरच्या उड्या सारखे प्रकार मुलांना शिकवावे. आताच त्यांना व्यायामाची गोडी लागली तर आयुष्भर शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते.

६. स्क्रीन टाईम – मुलांना बिझी ठेवायचे म्हणून बरेच पालक त्यांना टीव्ही, मोबाईल, टॅब इत्यादी देत आहेत. मुलेही बाहेर जाता येत नाही म्हणून काहीतरी कारण काढून स्क्रीन समोर बसत आहेत. याचे मुलांवर वाईट परिणाम होतात. पूर्वी जेवढं वेळ स्क्रीन टाईम होता तेवढंच वेळ आताही द्यावा. याव्यतिरिक्त शाळेचा काही अभ्यास असल्यास त्यासाठी वापरू द्यावा. मुले काय पाहतात यावर लक्ष असू द्यावे.

७. कोरोना बद्दल माहिती – सगळीकडे कोरोना विषयी चर्चा व चिंता असताना मुलांना त्यापासून दूर ठेवणे अशक्य आहे. मुलांना समजेल अश्या प्रकारे आपण नियमित मोजकी माहिती त्यांना देत राहावे. मुले आजूबाजूला असताना सारखं कोरोना विषयी माहिती घेणे, फोनवर बोलणे, न्यूज पाहणे टाळावे. मुलांना माहिती देताना भीती दाखवण्या ऐवजी काळजी घेणे बद्दल सांगावे. त्यांना धीर द्यावा, आपण यामधून बाहेर पडू असा आत्मविश्वास द्यावा. सकारात्मक बातम्या त्यांना सांगाव्या, त्यावर त्यांचा मत विचारावे. काही शंका असतील तर वेळीच दूर करणे चांगले. कोरोना विषयी अफवांपासून आपण स्वतः दूर राहून मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्यास शिकवणे गरजेचे आहे.

८. नवीन छंद जोपासणे – नेहमी वेळ नाही म्हणून टाळत असलेल्या गोष्टी ज्या आवडीच्या आहेत अश्या करण्यास सुरुवात करावी. मुलांना बैठे खेळ शिकवावे त्यामध्ये त्यांची रुची तपासावी व प्रोत्साहन द्यावे. मुलांना घरातील कामे तसेच स्वतची कामे करण्यास सुरुवात करून द्यावी. थोडा स्वयंपाकात मदत घ्यावी, असा करताना त्यांचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे.

९. वर्तवणुक बदल – मुलांमध्ये काही वर्तुवणुक दोष असतील तर त्याची डायरी करावी. ते असा का वागतात याची कारणमीमांसा करावी. त्यासाठी घरातील वातावरण व पालकांची प्रतिक्रिया यांचा अभ्यास करावा. मुलांशी याविषयी चर्चा करून बदल घडवण्यासाठी सर्वमताने नियोजन ठरवून प्रयत्न करावे. गरज पडल्यास मानसोपचार तज्ञांचा ऑनलाईन सल्ला घ्यावा किंवा प्रत्यक्ष भेट घ्यावी.

१०. तणावरहित जीवन साठी काही उपाय – दररोज पुरेशी झोप झोप घ्यायला सांगा. जागरण करू देऊ नये. नियमित सुसंवाद साधणे. मित्र, नातेवाईक यांच्याशी फोन वरून संपर्क ठेवणे. त्याने मन हलके व प्रसन्न होण्यासाठी मदत होते. नियमित व्यायाम करणे. योग्य प्रमाणात आणि वेळेवर जेवण करणे. नवीन गोष्टी शिकणे, नवीन छंद सुरू करणे. मेडी टेशन, योगा, प्रार्थना, एकांत वेळ याची सवय लावणे.

डॉ नितीन भोगे एमबीबीएस एमडी
मानसोपचार, व्यसनमुक्ती व लैंगिक समस्या तज्ञ
मनोविश्र्व क्लिनिक, सुधाकर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शर्मा स्वीट जवळ, सात रस्ता, सोलापूर.
संपर्क: ९१३०६२१५३१

परीक्षा शेवटच्या क्षणी नियोजन साठी काही टिप्स…

https://mindmoodsandmagic.wordpress.com/2020/02/20/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

परीक्षेच्या पूर्वी अंतिम क्षणी घ्यायची काळजी
१ आदल्या दिवशीच बॅग भरून ठेवा त्यामध्ये हॉल तिकीट ठेवा
२ लवकर झोपा
३ व्यवस्थित जेवण घ्या भूक नसेल तर फ्रुट ज्यूस घ्या
४ किटकीट करणारे नातेवइकांच्या फोन ला उत्तर देऊ नका
५ जेवढे जमेल तितके च वाचा
६ आदल्या दिवशी सगळं उजळणी करणे टाळा
७ शेवटच्या क्षणी परीक्षेला जाताना रेविजन करू नका, तसेच त्या विषयाचे चर्चा करू नका
८ सर्व सिलॅबस चा विचार न करता जे वाचत आहोत त्यावर लक्ष द्या
९ साधे सुती हलके कपडे वापरा, फॅन्सी किंवा अवजड पोशाख करू नका
१० सोशल नेटवर्किंग साईट्स पासून दूर रहा
११ मित्रांना मनापासून शुभेच्या द्या, मन हलके होईल
१२ नर्वस मित्रणापासून लांब रहा
१३ आपल्या पाल्यास अश्या वेळी उपदेश देणे टाळा
१४ परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका
१५ पेपर फुटणे किंवा महत्त्वाचे प्रश्न यामागे धावू नका
१६ सारखे वारंवार शिक्षकानं भेटत राहू नका
१७ परीक्षा केंद्रावर वेळेअगोदर पोहचा, शक्यतो स्वतः ड्रायव्हिंग करणे टाळा
१८ तुमचा विश्वास असेल तर प्रार्थना करा
१९ पेपर मिळण्यापूर्वी थोडा मोठा आणि सावकाश श्वास घेत रहा
२० प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर थोडी विश्रांती घ्या
२१ जे चांगले येते ते सुरुवातीला लिहा
२२ पेपर चालू असताना इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करू नका
२३ काही आठवत नसेल तर दीर्घ श्वास घ्या आणि शांत रहा
२४ एका प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुढचा प्रश्न सोडवा
२५ पेपर संपल्यावर तपासून पहा
२६ बाहेर आल्यावर उत्तरांची चर्चा करणे टाळा
२७ पुढच्या विषयाचे विचार चालू करा
२८ परीक्षा चालू असताना परीक्षा झाल्यानंतर चे इंजोयमेंट चे नियोजन करू नका
२९ जागे राहण्यासाठी अती प्रमाणात चहा किंवा कॉफी सेवन करू नका
३० तुम्हाला काय येते काय येत नाही याचा अंदाज घ्या, आणि जे अवघड वाटते ते सोडून द्या
३१ परीक्षेच्या काळात जास्त टीव्ही पाहू नका
३२ भरपूर पाणी प्या आणि फळे भाज्या खा
३३ अभ्यास करत असताना मित्रांना फोन करत बसू नये
३४ दर ४५ मिनिटांनी १० मिनिटे ब्रेक घ्या तेव्हा फोन करून घ्या
३५ ब्रेक मध्ये टीव्ही रिमोट ल हात लावू नका
३६ घरचे जेवण घ्या बाहेरचे जेवण टाळा
३७ ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याशी तुमच्या मनातील परीक्षेबाबत भावना बोलून दाखवा
३८ दिवसातून नियमित अंघोळ करा पाहिजे तर दोन वेळा पण करा
३९ जेव्हा तणाव जाणवेल तेव्हा व्यायाम करा, गाणी ऐका, किंवा रेलक्स सेशन एक्सर साइज करा
४० एखादे पान वाचून संपत नसेल तर पुढचे पान चालू करा
४२ सिगारेट, दारू किंवा इतर नशा करता कामा नये
४३ मित्र, मैत्रीण यांच्या संपर्क मध्ये राहण्याने चांगले वाटत असेल तर राहू शकता
४४ पालक, घरचे सदस्य यांच्यासोबत हसी मजाक करत रहा
४५ जेवण करताना अभ्यसाबद्दल बोलू नका
४६ घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी पालकांना विनंती करा
४७ लहान मुलांसोबत बसून छान वाटत असेल तर तसा अभ्यास करा अन्यथा टाळा
४८ दररोज ३० मिनिटे खेळायला जा, जखमा होतील असे खेळ टाळा
४९ आजार टाळण्यासाठी माच्छतदानी वापरा
५० पुढच्या एडमिशन ची चिंता करू नका
५१ दुपारी जास्त झोपू नका, रात्री मात्र सलग ७ तास झोप घ्या
५२ पेपर अवघड गेला तर मित्रांशी, शिक्षकांशी, त्याबद्दल बोलून मन हलके करा

जर झोप येत नसेल, बेचैनी होत असेल, उदास, घाबरल्या सारखे, निरर्थक वाटत असेल, पळून जावेसे वाटणे असेल तर समुपदेशक किंवा मानसोपचार तजज्ञांमार्फत मदत घ्या…

परीक्षे साठी खूप खूप शुभेच्छा…

लैंगिक समस्या आणि मानसिक स्वास्थ

लैंगिक शिक्षण हा शब्द कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरला जातो. यामध्ये नुसते शरीराच्या भागांची माहिती करुन घेणे अभिप्रेत नाही तर त्यासोबत होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घेणे, भावना संतुलित करायला शिकणे आवश्यक आहे. लैंगिकतेशी संबंधित विचार, भावना व वर्तन विवेकपूर्ण बनवणे अपेक्षित आहे. यालाच लैंगिक मानसिक स्वास्थ्य असे म्हणतात. आपल्या समाजाबद्दल विचार केला तर बरेच. समज व गैरसमज दिसून येतात. समाजातील व्यक्तिगणिक तसेच प्रदेश, जाती, धर्म, समूह, संस्कृती इत्यादिंमध्ये कामजीवनाविषयी मतभिन्नता आहे.
यामध्ये योग्य शिक्षणअभावी बऱ्याच लैंगिक समस्या उद्भवतात. ज्याचे रुपांतर कालांतराने मानसिक त्रासात किंवा आजारात होते.

एक मानसोपचारतज्ञ म्हणून वयात येणारी मुले मानसिक तक्रारी घेऊन आल्यानंतर त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधतो. त्यातून इतर समस्यांसोबतच लैंगिक गैरसमज व त्यातून येणारे न्यूनगंड हे ही एक महत्वाचे कारण समोर येते. परंतु याविषयी असणारी भिती, सामाजिक दबाव व हिनतेची भावना यामुळे मोकळेपणाने बोलणे होत नाही.

जेंव्हा आपणास पोटाचा त्रास होतो. आपण पोटविकार तज्ञाकडे जातो, हाडांचा आजार झाला तर हाडांच्या तज्ञांकडे जातो, मानसिक त्रास झाला तर मनोविकार तज्ञाकडे न लाजता जातो. परंतु जेंव्हा आपणास लैंगिक समस्या जाणवते उदा. लिंगातील शिथीलता, शिघ्रपतन किंवा समाधानकारक संबंध न होणे इ. तेव्हा आपण लैंगिक समस्या तज्ञ/ मानसोपचार तज्ञ यांच्याकडे जाणे टाळतो. याची काही कारणे आहेत. कारण आपण लैंगिकता हा विषय वाईट, किळसवाणा, न बोलण्याचा, किंवा कुसंस्कारी समजला जातो. आपणास लैंगिक उत्तेजना झाल्यास आपण ती दाबायचा प्रयतन करतो. याबद्दल अपराधीपणा येतो. एखाद्याने याविषयी बोलणे म्हणजे तो वाईट चारित्याचा समजला जातो. अगदी नवरा बायको पण एकमेकांशी याविषयी मोकळेपणाने बोलणे टाळतात. यामुळे योग्यवेळी तज्ञांकडे जाणे टाळले जाते. पण याचे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतात. न्युनगंड वाढत जातो. त्यातून आत्मविश्वास कमी होतो. नैराश्याची भावना किंवा आजार होतो. ज्यामुळे लैंगिक स्वास्थ्य अजून बिघडणे व एक चक्र चालू होणे. ज्यातून बाहेर पडतात. तज्ञ मदत करु शकतात.
खरंतर लैंगिक भावना या एक नैसर्गिक, आपोआप उत्पन्न होणाऱ्या आहेत. किंबहुना मानवास मिळालेली एक अनमोल भेट आहे ही बाकी शारीरिक क्रियांसारखीच एक क्रिया आहे.

दुसरे कारण म्हणजे लैंगिक समस्यांवर उपाय करणाऱ्या भोंदूंची वाढलेली संख्या व जाहिराती, यांना बळी पडणे. यांच्याकडे बऱ्याचवेळा कोणतीही वैद्यकीय पदवी नसते. याबद्दलचे प्रशिक्षण झालेले नसते. येणाऱ्या रुग्णास भिती घालून, अवैद्यकीय चुकीची माहिती देऊन उपचार करतात. यामुळे गैरसमज वाढीला जाऊन त्रास आणखीनच वाढतो, असे भोंदू लोक मुद्दाम, हस्तमैथुन चुकीचे आहे, किंवा स्वप्नदोष हा आजार आहे, असे गैरसमज पसरवतात. योग्य लैंगिक शिक्षणाचा अभावामुळे सामान्य व्यक्ती बळी पडते.

तिसरे महत्वाचे कारण म्हणजे, लैंगिक समस्या तज्ञाकडे कधी जावे हे न समजल्यामुळे. स्त्रिया ह्या स्त्रीरोग तज्ञाकडे जातात व त्यांच्या प्रजनन विषयी तक्रारी सांगतात. पण तेथेही लैंगिक समस्या सांगायला लाजतात. काही वेळा समस्या ही भावनिक, मानसिक असते तेंव्हा या विषयातील तज्ञ चांगले समुपदेशन व मार्गदर्शन करु शकतात.
अनेकदा पुरुष लैंगिक समस्येकरिता त्वचारोग व गुप्तरोग तज्ञांकडेही जातात. जे कि त्वचेची विकार व लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या रोगांचे तज्ञ असतात.

यामुळे सामान्य सर्व व्यक्तींनी हे समजून घेणे गरजेचे आहे, कि आपणास लैंगिक समस्या तज्ञ व समुपदेशनाकडे जाण्याची गरज कधी असते?

१. लैंगिक इच्छा कमी होणे किंवा बदल जाणवणे.

२. आपल्या पार्टनर सोबत लैंगिक संबंधाविषयी एकमत न होणे.

३. पुरुषांना लिंगात पुरेसा ताठरपणा न जाणवणे.

४. लैंगिक संबंध न ठेवता येणे समाधान होण्यापूर्वीच विर्यपतन होणे, विर्यपतन होण्यासाठी जास्त वेळ लागणे/ किंवा न होणे.

५. लैंगिकतेविषयी मनात त्रासदायक विचार येणे, बेचैन, अपराधीपणा वाटणे (स्वप्नदोषाविषयी, शीघ्रपतन विषयी इ.).

६. स्वत:च्या लैंगिक शरीराच्या भावना व विचारांविषयी साशंकता किंवा भिती वाटणे.

७. लैंगिक संबंधाविषयी आपल्या जोडीदारासोबत मनमोकळे संवाद न साधणे

८. स्वत:ची किंवा जोडीदाराची विचित्र लैंगिक आवड किंवा वर्तवणूक असणे.

९. लग्नापूर्वी लैंगिक, संबंधविषयी समुपदेशनसाठी

१०. याव्यतिरिक्त कोणत्याही शंकेचे शास्त्रीय, वैद्यकीय समुपदेशन करुन घेणे गरजेचे आहे.

आजच्या काळात जग इतकी प्रगती करीत असताना, समाजाने लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून सामान्य करणे गरजेचे आहे. यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणाऱ्या लैंगिक स्वास्थाविषयी जनजागृतीसाठी हा बोगस प्रयत्न असून सर्वांनी याविषयी योग्य माहिती घेऊन इतरांनाही गैरसमाजाच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत करावी.

यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने आत्महत्या प्रतिबंध हा विषय निवडला असून पौगंडावस्थेत लैंगिकतेमधील बदलातून होणारे गैरसमज, न्यूनगंड व नैराश्य यामधून उद्भवणाऱ्या आत्महत्येसारख्या घटना ह्या योग्य प्रकारच्या लैंगिक शिक्षणातून टळू शकतात. त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करुया. मनोविकारांना एकच आधार, द्या त्यांना आधुनिक मानसोपचार.

Depression awareness in marathi…

*नैरश्याकडे गाम्भीर्याने पाहणे का गरजेचे आहे?*

* नैराश्य हा एक प्रमुख सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. याच्यामुळे मुख्यत्वे मानसिक विकृती व जीवीत तसेच वित्तहानी होत आहे.

* नैराश्यामुळे मोठ्या प्रमाणावर लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, मध्यमवयीन आणि वयोवृध्द स्त्री आणि पुरुष, सर्व स्तरावरील व्यक्तींना त्रास होतो.

* नैराश्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये जैवीक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतीक घटकांचा समावेश होतो. याची सुरुवात वातावरणातील घडामोडींमुळे होते.

* अनेक दीर्घकालीन व असंसर्गजन्य व्याधी, व्यसनाधिनता व पोषणासंबंधी विकार यांचे कारण तसेच परिणाम म्हणूनही नैराश्याकडे पाहिले जाते. तसेच नैराश्याचा संबंध क्षयरोग, एच.आय.व्ही. यांच्याशीही येते.

* नैराश्य व आत्महत्या ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. टोकाचे नैराश्य आत्महत्येस कारण ठरते. म्हणून नैराश्याचे निदान सुरुवातीच्या काळात करुन वेळीच चांगले उपचार करणे हे आत्महत्या प्रतिबंधाची प्रमुख शस्त्र आहे.

* नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींबद्दल समाज, कुटंुब यांच्यामध्ये गैरसमजातून मनात अटी निर्माण होते. असे रुग्ण कामात कमी पडतात. सामाजिक व आिर्थक संधी मिळण्यापासून वंचित राहतात यामुळे त्यांचे जीवनमुल्य घटते.

* नैराश्याचे आर्थिक परीणाम भयंकर असून रुग्ण आजारपण आिण गरीबी याच्या दृष्टचक्रात अडकुन राहतो. यामध्ये कमी व मध्यम उत्पन्न गटातील कुटंुबे जास्त परीणामास तोंड देतात.

* नैराश्याने ग्रस्त रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत कारण अशा उपचारांचा अभाव, सामाजिक गैरसमज व भेदभाव या गोष्टी आहेत.

* यावरील विविध औषधोपचार व इतर उपचार हे संशोधनातून समोर आले असून त्यांची खात्रीपूर्वक फायदे सिध्द झालेले आहेत. याचा वापर विविध स्तरांवर व विविध पर्यायांमधून उपलब्ध आहे.

* कर्मचारी प्रशिक्षण, औषधांचा नियमित पुरवठा, समुपदेशन व मानसोपचाराची उपलब्धी यांच्यामुळे आरोग्यसेवा खंबीर होण्यास मदत होईल.

* सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी व या विषयी जनजागृती करणे या गोष्टींचे अनन्यसाधरण् महत्त्व आहे. यामुळे उपचारामध्ये व निदानामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात केली जाईल.

साधारणपणे नैराश्याच्या रुग्णांना त्यांना हा आजार झालेला आहे. यांची कल्पना नसते व याच्यावर उपचार होऊ शकतात असे वाटत नसते. बिघडलेल्या भावनांच्या भरात अश्या व्यक्ती आला आजार लपवतात व उपचार घेण्यापासून परावृत्त होतात. काही वेळा त्यांना जरी समजले की आपण आजारी आहोत, तरी याबद्दल उपचार मिळतो याची कल्पना नसते किंवा सामाजिक गैरसमजुतीमुळे त्यांना उपचार घेण्याची गरज वाटते. ते मानसिक रग्ण म्हणून संबोधले जाईल का याची निती बाळगतात. याच्यामुळे उपचारात फार मोठी तफावत राहते. पुढे जाऊन जे रुग्ण उपचार घेतात त्यातील बरेच जण उपचार पूर्ण करत नाहीत. किंवा मध्येच बंद करतात. याची बरीच कारणे आहेत. पण यामुळे हे आजार परत परत होतो.
नैराश्याविषयीच्या गैरसमजुतीमुळे भयंकर परिणामास तोंड द्यावे लागते. चुकीच्या समजुती व नकारात्मक भाव यांच्यामुळे अश्या रुग्णांसोबत वागण्यामध्ये बदल होतात. यामुळे लोकांच्या बघण्याचा दृष्टीकोण, उपचार घेण्याचे प्रयत्न, मदत घेण्याची भावना, सामाजिक सहभाग, व्यावसायीक एकात्मिका यावर दुरगामी परिणाम होतात. यावरील संगोपनातून दिसून आलेल्या आकडेवारीवरुन सामाजिक जाणीव वाढविण्याची अत्यंत गरज असल्याचे समोर आले आहे.

*नैराश्याचे निदान करण्यासाठीचे निकष -*

खालील पैकी लक्षणे कमीत कमी *दोन आठवड्यांपेक्षा* जास्त काळ असतात.
**मुख्य लक्षणे** –
१) सतत दिवसभर, दररोज उदास वाटणे किंवा निराश वाटणे
२) जवळ जवळ कशातच मन लागणे किंवा आंनद न वाटणे
३) सतत कंटाळा येणे किंवा थकल्या सारखे वाटणे

**इतर लक्षणे -**
१. आत्मविश्वास कमी होणे, पश्चाताप वाटणे, स्वत:बद्दल वाईट विचार येणे, मरणाचे किंवा आत्महत्येचे विचार येणे किंवा प्रयत्न करणे.
२. विचारशक्ती कमी होणे, लक्षण वाटणे, चीडचीड होणे, अनियमितपणा, झाेप आणि भूक बिघडणे.
३. भविष्याबद्दल नकारात्मक भाव असणे, एकटेपणा वाटणे, कशाबद्दल आशा न वाटणे.

*नैराश्यावरील उपचार* सर्व मानसोपचार तज्ञांकडे उपलब्ध असतात. ज्यामध्ये शास्त्रीय आधुनिक औषधे, समुपदेशन, मानसीक तपासण्या, ई.सी.टी. उपचार पध्दती इत्यांदींचा उपयोग होणे.

*डॉ. नितीन भोगे*
मानसोपचार तज्ञ
मनोविश्व क्लिनिक,
जूना आर. टी. ओ.,
रेल्वे लाइन्स, सोलापूर
*९९२३९६४५६७*
*९१३०६२१५३१*