“लॉकडाउन आणि मुलांचे मानसिक स्वास्थ्य”

“लॉकडाऊन आणि मुलांचे मानसिक स्वास्थ्य”

गेल्या आठवड्यात एक सातवी चा मुलाला घेऊन त्याचे वडील ओपीडी मध्ये आले.
“मुलगा अचानक वेगळाच वागत आहे. सारखं हे दुखत ते दुखत असा म्हणत आहे. लहान मुलांच्या डॉक्टर ला पण दाखवले. सर्व तपासण्या करून घेतल्या आणि त्या नॉर्मल आहेत. त्यामुळं तुम्हाला दाखवायला सांगितले आहे.”
मी सर्व माहिती घेतली. त्याप्रमाणे मुलगा थोडा हट्टी होता परंतु समजूतदार पण होता. लक्षणे सुरू होण्यापूर्वी एक आठवड्यामध्ये समोरच्या अपार्टमेंट मध्ये कोरोना मुळे दोन मृत्यू झाले होते. तसेच एक जवळचे नातेवाईक ही कोरोना मुळे आजारी पडले होते. या सर्व गोष्टींची चर्चा घरात होतच असते.
त्याच्या शी बोलल्या नंतर लक्षात आले की त्याला विश्वासात घेऊन ही सगळी चर्चा करण्यात आली नाही. अचानक त्याच्या वेळापत्रक बदल घडत गेले. याच्याशी त्याला जुळवून घेता आले नाही. ज्याचा त्याच्या मनावर तान आला. कसे वागावे हे न समज्यामुळे घाबरून गेला व वागण्यात विचित्र बदल होत गेले.
त्याच्याशी संवाद साधून त्याला नियमित वेळापत्रक ठेवून काही छंद जोपासण्यासाठी सांगितले. तात्पुरती औषध देऊन वडिलांना धीर दिला व त्याच्याशी वागण्यासाठी समुपदेशन केले.

या उदाहरणांसह आपल्या लक्षात येईल की कमी अधिक प्रमाणात लहान मुलांमध्ये अश्या समस्या पहायला मिळू शकतात.

या समस्या टाळायच्या असतील तर आपण काही काळजी घेतली पाहिजे.

१. वेळेचे नियोजन – बहुतांशी मुलांचा दिनक्रम बिघडलेला आहे. त्यामध्ये नियमितता असायला हवी. मुलांना नवीन वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे वागायला सांगणे. सकाळी उठणे, खेळणे अभ्यास इत्यादी गोष्टींचा वेळ ठरवून देणे. आता काही ठिकाणी शाळेचा अभ्यासक्रम चालू झालेला आहे. त्याप्रमाणे तो करून घेणे गरजेचे आहे.

२. शिक्षण – आता मुले घरीच असल्यामुळे पालक हेच त्यांचे शिक्षक असणार आहेत. शालेय अभ्यासक्रम सोबतच मूल्य शिक्षण ही तितकेच महत्त्वाचे आहे. इतर पुस्तके वाचायला देणे त्यावर चर्चा करणे अश्या गोष्टीचा सहभाग हवा. शाळेच्या अभ्यासात काही अडचण येत असल्यास त्याबाबत योग्य मार्गदर्शन शाळेतून भेटत असेल तर घ्यावे.

३. सुसंवाद – घरामध्ये सर्व नातेवाईक व मुले यांचा संवाद होण्यासाठी आता पोषक वेळ आहे. कोरोना संबंधी काही चर्चा असल्यास ती मुलांपासून लपवू नये. त्यांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. तसेच पुढील भविष्यकाळात येणाऱ्या कष्टांची कल्पना द्यावी.

४. मानसिक आरोग्य – या वेळात मुलांना एकटा बसून विचार करू द्यावा. त्यांना योगा, मेडिटेशन इत्यादी गोष्टींची ओळख करून द्यावी. मनातल्या गोष्टी इतरांशी बोलून दाखवण्यास प्रोत्साहन द्यावे. इतरांना धन्यवाद देणे, चांगले म्हणणे अश्या सकारात्मक सवयी लागल्यामुळे सकारात्मक विचार वाढण्यास मदत होईल.

५. शारीरिक व्यायाम – मिळालेल्या संधीचा उपयोग करून घरातल्या घरात करता येतील असे व्यायाम प्रकार मुलांना शिकवावे. त्यांच्यासोबत आपण पण करावे. सूर्यनमस्कार, योगा, दोरीवरच्या उड्या सारखे प्रकार मुलांना शिकवावे. आताच त्यांना व्यायामाची गोडी लागली तर आयुष्भर शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते.

६. स्क्रीन टाईम – मुलांना बिझी ठेवायचे म्हणून बरेच पालक त्यांना टीव्ही, मोबाईल, टॅब इत्यादी देत आहेत. मुलेही बाहेर जाता येत नाही म्हणून काहीतरी कारण काढून स्क्रीन समोर बसत आहेत. याचे मुलांवर वाईट परिणाम होतात. पूर्वी जेवढं वेळ स्क्रीन टाईम होता तेवढंच वेळ आताही द्यावा. याव्यतिरिक्त शाळेचा काही अभ्यास असल्यास त्यासाठी वापरू द्यावा. मुले काय पाहतात यावर लक्ष असू द्यावे.

७. कोरोना बद्दल माहिती – सगळीकडे कोरोना विषयी चर्चा व चिंता असताना मुलांना त्यापासून दूर ठेवणे अशक्य आहे. मुलांना समजेल अश्या प्रकारे आपण नियमित मोजकी माहिती त्यांना देत राहावे. मुले आजूबाजूला असताना सारखं कोरोना विषयी माहिती घेणे, फोनवर बोलणे, न्यूज पाहणे टाळावे. मुलांना माहिती देताना भीती दाखवण्या ऐवजी काळजी घेणे बद्दल सांगावे. त्यांना धीर द्यावा, आपण यामधून बाहेर पडू असा आत्मविश्वास द्यावा. सकारात्मक बातम्या त्यांना सांगाव्या, त्यावर त्यांचा मत विचारावे. काही शंका असतील तर वेळीच दूर करणे चांगले. कोरोना विषयी अफवांपासून आपण स्वतः दूर राहून मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्यास शिकवणे गरजेचे आहे.

८. नवीन छंद जोपासणे – नेहमी वेळ नाही म्हणून टाळत असलेल्या गोष्टी ज्या आवडीच्या आहेत अश्या करण्यास सुरुवात करावी. मुलांना बैठे खेळ शिकवावे त्यामध्ये त्यांची रुची तपासावी व प्रोत्साहन द्यावे. मुलांना घरातील कामे तसेच स्वतची कामे करण्यास सुरुवात करून द्यावी. थोडा स्वयंपाकात मदत घ्यावी, असा करताना त्यांचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे.

९. वर्तवणुक बदल – मुलांमध्ये काही वर्तुवणुक दोष असतील तर त्याची डायरी करावी. ते असा का वागतात याची कारणमीमांसा करावी. त्यासाठी घरातील वातावरण व पालकांची प्रतिक्रिया यांचा अभ्यास करावा. मुलांशी याविषयी चर्चा करून बदल घडवण्यासाठी सर्वमताने नियोजन ठरवून प्रयत्न करावे. गरज पडल्यास मानसोपचार तज्ञांचा ऑनलाईन सल्ला घ्यावा किंवा प्रत्यक्ष भेट घ्यावी.

१०. तणावरहित जीवन साठी काही उपाय – दररोज पुरेशी झोप झोप घ्यायला सांगा. जागरण करू देऊ नये. नियमित सुसंवाद साधणे. मित्र, नातेवाईक यांच्याशी फोन वरून संपर्क ठेवणे. त्याने मन हलके व प्रसन्न होण्यासाठी मदत होते. नियमित व्यायाम करणे. योग्य प्रमाणात आणि वेळेवर जेवण करणे. नवीन गोष्टी शिकणे, नवीन छंद सुरू करणे. मेडी टेशन, योगा, प्रार्थना, एकांत वेळ याची सवय लावणे.

डॉ नितीन भोगे एमबीबीएस एमडी
मानसोपचार, व्यसनमुक्ती व लैंगिक समस्या तज्ञ
मनोविश्र्व क्लिनिक, सुधाकर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शर्मा स्वीट जवळ, सात रस्ता, सोलापूर.
संपर्क: ९१३०६२१५३१

Published by nbhoge

MBBS MD Psychiatry Consultant Psychiatrist Solapur Maharashtra India

Leave a comment