कोरोना मृत्यू – वियोग आणि शोक

मृत्यू – वियोग आणि शोक

आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तरी जवळच्या व्यक्तीचा मृत्यूला तोंड द्यावे लागते. शोक म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प्रिय गोष्टीचा जाण्याने होणारे भावनिक, वैचारिक आणि वर्तणूक संबंधी बदल. वियोगाचे दुःख म्हणजे जवळच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर होणारा शोक.
वियोग आणि शोक यामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचे उदासी पासून ते उग्र स्वरूपाचा राग अशा कोणत्याही भावना येऊ शकतात. एखाद्या व्यक्ती कोणती प्रतिक्रिया देईल हे त्याच्या कौटुंबिक, सामाजिक, आणि शैक्षणिक पार्श्वभूमी, तसेच त्याची वैचारिक ठेवण, पूर्वीचे मत याबरोबरच गेलेल्या गोष्टीचा किंवा मृत व्यक्तीशी त्याचे संबंध यावर अवलंबून असते.

शोक म्हणजे फक्त खिन्नता नसून यामध्ये अपराधीपणा, जीवाची तळमळ, राग, आणि पश्चाताप यांचाही समावेश असतो. खूपदा भावनांचा आवेग किंवा कमतरता आपल्याला आश्चर्यचकित किंवा गोंधळून टाकू शकते. एखादा व्यक्ती वाईट संबंध असूनही दुःखी असेल. एकीकडे आपला आप्त कर्करोगाने गेला म्हणून वाईट पण वाटते तर मृत व्यक्तीला सुटका मिळाली म्हणून थोड बर पण वाटते.

वियोग असणारा व्यक्ती गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे निरनिराळे अर्थवाव काढून, एका विचारातून दुसऱ्या विचारात जात राहतो. जसे की, मृत व्यक्ती ने आयुष्य चांगले जगले म्हणून समाधान वाटेल, किंवा इतक्या लवकर जायला नको होते म्हणून त्रास होईल. लोक स्वतः वेगवेगळ्या गोष्टींना जबाबदार ठरवतात, उदा माझ्या हातात काही नव्हते पासून ते पूर्णपणे माझीच चूक होत पर्यंत.

वियोग मध्ये काहीजण आपल्या भावना इतरंजवळ व्यक्त करतात तर काहीजण एकटे राहतात व स्वतः ला व्यायाम किंवा लेखन अशा एकलकोंडया कामात गुंतवून घेतात.

मानसशास्त्रा प्रमाणे शोकाचे काही टप्पे असतात ते कुब्लर-रॉस यांनी शोधले आहेत.

  1. घडलेली घटना अमान्य असणे
  2. घडलेल्या घटनेबद्दल राग येणे
  3. जर तर विचारसरणी
  4. निराश वाटणे
  5. घडेलेले मान्य करणे
    कुब्लर-रॉस यांच्या मतानुसार प्रत्येकजण वरीलपैकी कमीतकमी दोन टप्पे तरी अनुभवतो. तर काही व्यक्ती वरील टप्पे आयुष्यात परत परत अनुभवतात.

शोक भावनेतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी करण्याची गरज असते.

  1. आप्तेष्ट मृत झाला हे मान्य करणे.
  2. वियोगचे दुःख सहन करणे.
  3. मृत व्यक्ती शिवाय आयुष्य सांभाळणं.
  4. आयुष्यात पुढे जात असताना मृत व्यक्तीच्या आठवणींशी जोडून राहणे.
  5. नवीन जबाबदाऱ्या सांभाळून घेणे.
  6. नवीन आयुष्याची सुरुवात करणे.

प्रत्येकाची शोक करण्याची जशी वेगळी वेगळी शैली असते ,तसेच त्यामधून बाहेर पडायला लागणारा वेळ पण वेगवेगळा असतो. बरेचजण सहाच महिन्यात बाहेर पडतील तर बाकी बरेच दिवस दुःखात राहतील. शोक जास्त दिवस राहिल्यास त्याचे दुष्परिणाम दिसतात यापैकी सर्वात जास्त आणि महत्वाचे म्हणजे नैराश्य.

शोक काळात भावना कठीण आणि गुंतागुंतीच्या असतात. परंतु यावेळी मौज, आनंद, विनोद, समाधान या भावना असूच नये असं काही नाही. स्वतःची काळजी, विरंगुळा, सामजिक आणि कौटुंबिक आधार यांचे फार महत्त्व आहे.

वियोग मृत्युमुळे असो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असो त्याचे दुःख सारखेच असते. यामध्ये अत्यंत कठीण गोष्ट म्हणजे नवीन परिस्थिती मध्ये स्थिर होणे, तेही आपल्या प्रियजनाचा अनुपस्थितीमध्ये. यासाठी आपणास नवीन दिनचर्या ठरवावी लागते तसेच भविष्याच्या दृष्टीने परत निर्णय बदलावे पण लागतात.

  • वियोगाच्या दुःखावर वेळ हे औषध आहे *असं म्हणतात कारण वेळ जाईल तसे याची तीव्रता कमी होत जाते. तरीही जवळपास १५% लोकांना याच्या दुष्परिणामा मधून जावे लागते.

यासाठी काही लक्षणे धोक्याची समजू शकतो ती खालीलप्रमाणे

  1. तीव्र उदासी आणि वेदनादायक भावना.
  2. एकटेपणाची किंवा निराशादायी विचार.
  3. मृत व्यक्तीला परत भेटण्याची इच्छा.
  4. सतत मृत व्यक्तीचं किंवा मृत्युसमयी चा विचार करणे.
  5. मृत व्यक्तीच्या सोबत असणाऱ्या आनंदी क्षणाच्या आठवणी सांगणे अवघड वाटणे.
  6. मृत व्यक्तीच्या वस्तू किंवा ठिकाणी जाणे टाळणे.
  7. सर्वांपासून स्वतःला दूर करणे आणि एकटे एकटे राहणे,
  8. आपल्या आयुष्यात पुढे काही करण्याची इच्छा नसणे.

अश्या प्रकारच्या परिस्थिती मध्ये तनावामधून शरीरात विविध प्रकारचे रासायनिक बदल होऊन त्याचा शारीरिक प्रक्रिया वरती पण परिणाम दिसायला सुरू होतो.

कोरोना आणि शोक

इतर वेळी उपलब्ध असणाऱ्या रुढी परंपरा आणि विधी यामुळे व्यक्तीला शोक मधून बाहेर येण्यास मदत होत होती. परंतु कोरोणा मूळे आपणास अशा वेळी आपले आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासोबत आपल्या भावना व दुःख व्यक्त करता येत नाही. त्यामुळे अश्या भावना एकट्याने सामोरे जाताना अत्यंतिक त्रास जाणवू शकतो. म्हणून आपण याची माहिती घेणे गरजेचे आहे. आजच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडिया मूळे काही प्रमाणात त्याची भरपाई होऊ शकते.

नेहमीची काळजी घेत असताना आपणास अजूनही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोरोना हे संकट मोठे आहे. हे आपण मान्य केले पाहिजे. त्यासाठी हारकिरी न करता सावधानता बाळगली पाहिजे. भावनिक समतोल राखता आला पाहिजे. आपल्या आप्तेष्ट व्यक्ती ची काळजी घेताना स्वतःला पण सुरक्षित ठेवले पाहिजे.

यावेळी इतर नातेवाईक भेटू शकत नाहीत हे आपण स्वतःला समजावले पाहिजे. ते यात नाहीत म्हणजे आपण अजून एकटे पडलो असं गैरसमज करून घेऊ नये. होईल तेवढे कुटुंबासोबत राहवे. घरातील लहान मुले यांच्या भावनेचा विचार जरूर करावा. ते लहान आहेत त्यांना कमी त्रास होतो असा विचार करू नये. त्यांना समजेल अशा प्रकारे सर्व गोष्टी खर खर सांगाव्या. त्यांचे दैनंदिन दिनक्रम बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आपणही आपले दिनक्रम सुरू ठेवावा.

जे तुमचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्या नियमित संपर्कात राहावे. वडिधाऱ्या मंडळी सोबत बोलत राहवे. त्यांची भीती कमी करावी. त्यांना आधार द्यावा.

यातूनही काही जास्त मानसिक त्रास जाणवत असेल या वियोगतून बाहेर पडणे कठीण जात असेल तर समुपदेशक किंवा मानसोपचरतज्ज्ञ ची भेट घ्यावी.

व्यक्ती लहान होता की मोठा होता, जवळचा होता की लांबचा होता यावर तुमचा त्रास ठरत नाही. मदत घेतल्याने नक्कीच त्रास कमी होईल. आपल्या भावनांचा समतोल राखणे आणि इतर दुष्परिणाम होऊ न देणे महत्वाचे आहे.

शेवटी काय वेळ हेच औषध आहे शोक वर ही आणि कोरोना वर ही.

ही वेळ निघून जाईल तो पर्यंत आपण सावध राहूया.

डॉ नितीन भोगे
एम .बी.बी.एस. एम. डी.
मानसोचार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या तज्ञ.
9923964567

“मनोविश्व क्लिनिक”
943, सुधाकर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शर्मा स्वीट जवळ, सात रस्ता चौक, सोलापूर.
9130621531

Published by nbhoge

MBBS MD Psychiatry Consultant Psychiatrist Solapur Maharashtra India

One thought on “कोरोना मृत्यू – वियोग आणि शोक

  1. सर, योग्य उपचार वेळेत मिळू शकत नसल्यानेच कोरोना साथीबद्दल अज्ञानातून भीतीचे भूत मानगुटीवर बसले आहे. या नव्या मनोविकाराने आता कोरोनापेक्षाही अधिक दहशत निर्माण केली आहे. आपल्या सारख्या सजग तज्ज्ञांकडून आता जनजागृती अपेक्षित आहे.

    Liked by 1 person

Leave a comment